अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यात मोठे नुकसान; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख मदतीची मागणी अंतुर्ली ता. मुक्ताईनगर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यात मोठे नुकसान; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख मदतीची मागणी
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : जिल्ह्यात ३१ मार्च तसेच १ व २ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीमुळे केळी, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची विना अट मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले असून, अंतुर्ली, मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तसेच जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह गारपिटीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे हतबल, निराश व आर्थिकदृष्ट्या कोलमडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सॅटेलाईटद्वारे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व हेक्टरी एक लाख रुपयांचे तात्काळ सानुग्रह अनुदान जाहीर करावे. तसेच शेतकऱ्यांची वीजबिले माफ करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, ज्या पद्धतीने थकीत कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती, त्याच धर्तीवर नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपये खात्यात जमा करावेत, तसेच २०२५-२६ या वर्षातील नवीन व चालू कर्जदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन तहसीलदार, मुक्ताईनगर यांच्या मार्फत पाठविण्यात आले असून, यावर प्रदेश सचिव अनिल सेनू वाडीले, अंतुर्ली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख भैय्याजी शेख करिम तसेच सामाजिक कार्यकर्ते किरण शामराव धायले यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

No comments