adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वादळी पावसानंतर चोपडा नगर परिषद अॅक्शन मोडमध्ये; मुख्याधिकाऱ्यांची पाहणी, अतिक्रमण व प्लास्टिक वापरावर कडक कारवाईचा इशारा

 वादळी पावसानंतर चोपडा नगर परिषद अॅक्शन मोडमध्ये; मुख्याधिकाऱ्यांची पाहणी, अतिक्रमण व प्लास्टिक वापरावर कडक कारवाईचा इशारा  चोपडा प्रतिनिधी ...

 वादळी पावसानंतर चोपडा नगर परिषद अॅक्शन मोडमध्ये; मुख्याधिकाऱ्यांची पाहणी, अतिक्रमण व प्लास्टिक वापरावर कडक कारवाईचा इशारा 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : शहरात २ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या जोरदार वाऱ्यासह वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर चोपडा नगर परिषद प्रशासनाने तात्काळ अॅक्शन घेत मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले.

धनवाडी फाटा, देशमुख संकुल, पंकज स्टॉप, मेन रोड आणि एकविरा नगर या भागांची पाहणी करताना अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे तसेच काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. विशेषतः गटारींमध्ये प्लास्टिक अडकल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचे स्पष्ट झाले.

पाहणीदरम्यान धनवाडी फाटा ते पंकज स्टॉप परिसरात रस्त्यालगत अतिक्रमण झाल्यामुळे पाणी साचण्याची समस्या अधिक गंभीर झाल्याचे समोर आले. यावर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना तात्काळ अतिक्रमण हटवण्याचे कडक आदेश देत प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवरही संताप व्यक्त केला. पुढे प्लास्टिकचा वापर आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, स्वच्छता विभागाला तात्काळ सर्व गटारींमधील कचरा व प्लास्टिक काढून पाणी प्रवाहित करण्याचे आदेश देण्यात आले. बांधकाम विभागाला पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी पर्यायी गटार व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर विद्युत विभागाला वादळामुळे सैल झालेल्या तारा दुरुस्त करून पथदिवे सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

स्थानिक लोकप्रतिनिधींनीही शहरातील समस्यांबाबत प्रशासनाशी संपर्क साधत पाठपुरावा केला होता. त्यानुसार नगर परिषदेची टीम तात्काळ कामाला लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासन थेट घटनास्थळी येऊन समस्या सोडवत असल्याचे पाहून शहरवासीयांनी या मोहिमेचे स्वागत केले.

या पाहणी दौऱ्यात स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंखे, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, शहर समन्वयक स्वप्निल धनगर, उमेश कापरे, मुकादम सुनील बाविस्कर, राहुल सपकाळे, जयेश बागरे आदी कर्मचारी सहभागी होते.

"शहरातील जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी नगर परिषद प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे. नागरिकांनी गटारीत प्लास्टिक टाकणे टाळावे व प्रशासनास सहकार्य करावे," असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले.

No comments