फैजपूर येथे जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ उत्साहात संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हे...
फैजपूर येथे जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ उत्साहात संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील जे. टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये अंतिम वर्ष अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांसाठी आयोजित “निरोप समारंभ २०२६” हा कार्यक्रम सोमवारी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. प्राचार्य श्री. पी. एम. राणे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत, “आज तुम्ही पदविका घेऊन बाहेर पडत आहात; मात्र महाविद्यालयात मिळालेले संस्कार आयुष्यभर सोबत राहतील,” असे मनोगत व्यक्त केले. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत वर्कशॉपमधील प्रात्यक्षिके, औद्योगिक प्रशिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांच्या अनुभवांचे भावनिक कथन केले. या वेळी अनेक विद्यार्थी भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कनिष्ठ विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अधिकच रंगतदार केले. कार्यक्रमादरम्यान अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य व विभागप्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन करत, “अपयशाला घाबरू नका, सातत्याने शिकत राहा आणि प्रामाणिकपणाने कार्य करा,” असा संदेश दिला. या समारंभात भावना, आठवणी आणि नव्या स्वप्नांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थी महाविद्यालयाचा निरोप घेताना नव्या उमेदीने व डोळ्यांत स्वप्ने घेऊन पुढील वाटचालीस सज्ज झाले. कार्यक्रमाला तंत्रनिकेतनचे सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. शरद महाजन, उपाध्यक्ष श्री. उल्हास चौधरी, सचिव विजय झोपे व सहसचिव श्री. शशिकांत चौधरी यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशासाठी प्रा. भुवनेश्वरी नेमाडे, प्रा. मनोज फेगडे, प्रा. जयंत बेंडाळे, प्रा. सोनाली फेगडे व प्रा. अजय कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. समन्वयक म्हणून प्रा. अजिंक्य भारंबे, प्रा. आनंद वाणी, जयेश भोई, रुपाली चौधरी व वेदिका वारके यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन वैभवी बढे व ओम महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन आदिनाथ वाघ यांनी केले.

No comments