फैजपूर येथे एम पी जे तर्फे पाणी हक्क-अधिकार’ अभियानाची जनजागृती मोहीम इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्रातील वाढत...
फैजपूर येथे एम पी जे तर्फे पाणी हक्क-अधिकार’ अभियानाची जनजागृती मोहीम
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्रातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस’ (एम पी जे ) तर्फे राज्यव्यापी ‘पाणी हक्क-अधिकार’ अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत फैजपूर येथे कॉर्नर मिटिंगसह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नागरिकांना पाणी हा मूलभूत हक्क असल्याची जाणीव करून देण्यात आली. राज्यातील अनेक भागांत पाण्याची परिस्थिती गंभीर असून काही ठिकाणी नळ वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी नळ कोरडे पडले आहेत. भूजल पातळी सातत्याने घटत असल्याने ग्रामीण व शहरी गरीब भागात टँकरवर अवलंबित्व वाढले आहे. तसेच पिण्याच्या पाणी पाच-सहा दिवसात दोन तास येत आहे अनेक ठिकाणी पाणी येत नाही. फैजपूर शहरातील यावल रोड, साने गुरुजी नगर, इस्लामपुरा, झोपडपट्टी भाग, तहानगर मागचा भाग, पठाण वाडी, कुरेशी मोहल्ला, मिल्लत नगर मागचा भाग तसेच बाहेर पेठ मागचा भाग अशा अनेक ठिकाणी पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अभियानांतर्गत गावोगावी सभा, वस्तीस्तरावर बैठक, चौकसभा तसेच फैजपूरमध्ये घेण्यात आलेल्या कॉर्नर मिटिंगद्वारे पाणी हक्क व शासन धोरणांची सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांच्या गरजांचे सर्वेक्षण, माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळविणे, जल साक्षरता आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. या कार्यक्रमात (एम पी जे)चे स्थानिक शहर अध्यक्ष रहिमुद्दीन, उपाध्यक्ष बी. डी. महाले सर, सचिव असदुल्लाह सर, सदस्य शोएब इंजिनिअर, साईम कुरेशी, इक्बाल खान, शेख लुकमान, मुजफ्फर कुरेशी, आदिल मलिक, सुनील लसुरे तसेच सर्व नागरिक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “पाणी हा हक्क आहे, दया नाही” असा संदेश दिला. कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि पाणी प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments