अंतुर्ली परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक व शेतकरी हैराण किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर: तालुक्यातील अंतु...
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर: तालुक्यातील अंतुर्ली व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांसह शेतकरी वर्ग मोठ्या त्रासाला सामोरे जात आहे. दिवस असो वा रात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महावितरण कंपनीकडून लोडशेडिंग नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. वीज गेल्यानंतर महावितरणच्या संपर्क क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यंदा तापमानाने उच्चांक गाठला असून पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. अशा कडक उन्हाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, शेतकरी वर्गालाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. केळी पिकाला नियमित पाण्याची आवश्यकता असताना सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वाढत्या तापमानामुळे केळी बागा वाचवणे कठीण बनले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
वीज वितरण कंपनीने तातडीने योग्य उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करावा तसेच नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments