adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा शहरातील अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू; प्रशासनाला उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश

चोपडा शहरातील अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू; प्रशासनाला उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

चोपडा शहरातील अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू; प्रशासनाला उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या 25 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पर्यंत अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी उपविभागीय अधिकारी अमळनेर मयुर भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीला चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा नगरपरिषद मुख्याधिकारी रामनिवास झंवर तसेच नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील विविध भागांमधील शासकीय जमिनी, त्यावरील निवासी अतिक्रमणांची सद्यस्थिती, आरक्षणे तसेच शासन निर्णयानुसार पात्रतेच्या अटींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना नियमितीकरण प्रक्रियेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने आणि गतिमान पद्धतीने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. 


योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी माहितीपर बॅनर लावणे, घंटागाडी तसेच विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना अर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी तात्काळ अर्ज वितरण सुरू करण्यासही सांगण्यात आले.

तसेच नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्या उपस्थितीत ‘अतिक्रमण नियमानुकूल मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. या मदत कक्षामार्फत अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती, पात्रतेच्या अटी तसेच संपूर्ण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

दरम्यान, काही नागरिक अर्ज व आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती घेण्यासाठी उपस्थित झाले असता, उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांच्या हस्ते त्यांना अर्ज वितरित करण्यात आले. तसेच हे अर्ज जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरणासाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांनी शासन निर्णयाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करावेत तसेच अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींसाठी मदत कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अमळनेर यांनी केले आहे.

No comments