सफाई कामगार हे आरोग्याचे 'फ्रंटलाईन सैनिक';त्यांच्या समस्यांना प्राधान्य द्या! राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर या...
सफाई कामगार हे आरोग्याचे 'फ्रंटलाईन सैनिक';त्यांच्या समस्यांना प्राधान्य द्या!
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचे जिल्हा प्रशासनाला कडक निर्देश
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-सफाई कामगार हे समाजाच्या आरोग्याचे रक्षण करणारे खरे 'फ्रंटलाईन सैनिक' आहेत.त्यांच्या नियुक्ती, पुनर्वसन आणि आरोग्याशी संबंधित प्रश्न प्रलंबित न ठेवता ते तातडीने मार्गी लावावेत," असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले.अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सफाई कामगारांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार त्वरित नियुक्त्या देण्यात याव्यात.
हक्काचे घर: 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने' अंतर्गत सफाई कामगारांना मोफत सदनिका आणि मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासनाने गती द्यावी.
सुरक्षा व सन्मान: 'हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध अधिनियम, २०१३' ची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी व्हावी. कामगारांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळणे अनिवार्य आहे.
आरोग्य व विमा: कामगारांची नियमित आरोग्य तपासणी आणि विमा संरक्षण सुनिश्चित करावे. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी विशेष सुविधा पुरवाव्यात.
वेळेवर वेतन: सफाई कामगारांना त्यांचे किमान वेतन दरमहा ठराविक वेळेत मिळेल, याची मुख्याधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.
"सफाई कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पुनर्वसन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तालुकानिहाय विशेष मोहीम राबवावी आणि लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून द्यावा."
— शेरसिंग डागोर, अध्यक्ष, राज्य सफाई कर्मचारी आयोग.
प्रशासकीय उपस्थिती:
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांच्यासह सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि सफाई कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष डागोर यांनी प्रत्यक्ष कामगारांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

No comments