adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बस प्रवासातील २२ तोळे सोने चोरी प्रकरणाला नवे वळण; सराफावर कारवाईची मागणी, उपोषणाचा इशारा

बस प्रवासातील २२ तोळे सोने चोरी प्रकरणाला नवे वळण; सराफावर कारवाईची मागणी, उपोषणाचा इशारा सचिन मोकळं | अहिल्यानगर (संपादक - हेमकांत गायकवाड)...

बस प्रवासातील २२ तोळे सोने चोरी प्रकरणाला नवे वळण; सराफावर कारवाईची मागणी, उपोषणाचा इशारा


सचिन मोकळं | अहिल्यानगर

(संपादक - हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर : बस प्रवासादरम्यान चोरीला गेलेले २२ तोळे सोन्याचे दागिने कोतवाली पोलिसांनी तत्परतेने शोधून काढत मोठे यश मिळवले असले, तरी या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पीडित महिलेने आक्रमक भूमिका घेत उपोषणाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तींविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेवासा तालुक्यातील करजगाव येथील मिनाबाई ज्ञानदेव बडाख या ७ एप्रिल २०२६ रोजी पुणे–पाथर्डी बसने प्रवास करत असताना त्यांच्या बॅगेतून २२ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणाचा कोतवाली पोलिसांनी तांत्रिक तपास करत माया कल्याण भोसले (रा. हादगाव, ता. शेवगाव) हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीचे सोने बोधेगाव येथील सराफ भागवत मधुकर आदापुरे याला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी कायदेशीर पंचनामा करून २० तोळे सोने जप्त केले आहे.

सराफावर कारवाईची मागणी, उपोषणाचा इशारा

"सराफांनी चोरीचे सोने खरेदी करणे थांबवले, तर चोरीच्या घटनांमध्ये मोठी घट होईल," असे मत पीडित मिनाबाई बडाख यांनी व्यक्त केले. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत संबंधित सराफाला सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पोलिसांच्या कारवाईत अडथळे; नागरिकांत संताप

कोतवाली पोलिसांनी निष्पक्ष तपास करून मुद्देमाल हस्तगत केला असतानाही काही व्यक्तींमार्फत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे. चोरीचे सोने जप्त करण्यासाठी पोलिस गेले असता त्यांच्या कामात अडथळा आणणे, सराफांची दिशाभूल करणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी सातारा व वालचंदनगर पोलीस ठाण्यांत अशा स्वरूपाच्या नोंदी झाल्याचेही समोर आले आहे.

दक्षता समितीशी संबंध नसल्याची माहिती

महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार पोलीस आणि सुवर्णकार यांच्यात समन्वय राहावा यासाठी ‘सुवर्णकार दक्षता समिती’ स्थापन करण्यात आली आहे. मात्र सध्या पोलिसांच्या कारवाईला विरोध करणाऱ्या व्यक्तींचा या अधिकृत समितीशी कोणताही संबंध नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी काही जण सुवर्णकार बांधवांची दिशाभूल करत असल्याची चर्चा शहरात रंगत आहे.

पीडितेची ठाम भूमिका

"पोलिसांच्या तत्परतेमुळे माझे सोने परत मिळाले, मात्र चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे. अशा सराफांना पाठीशी घालणाऱ्यांचा बुरखा फाडणे गरजेचे आहे."

मिनाबाई बडाख (पीडित महिला)

 

No comments