जनगणना 2027 स्वगणना मोहिमेस चोपडा शहरातील व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांना आकर्षक भेटवस्तूंद्वारे प्रोत्साहन चोपडा प्रतिनिधी...
जनगणना 2027 स्वगणना मोहिमेस चोपडा शहरातील व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांना आकर्षक भेटवस्तूंद्वारे प्रोत्साहन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारत सरकारच्या जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या स्वगणना मोहिमेस चोपडा शहरातील व्यापारी व व्यावसायिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांना स्वगणनेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील विविध व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यास सुरुवात केली असून या उपक्रमांमुळे स्वगणना मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिरंगा चौक येथील आनंद सुपर शॉपी चे संचालक चेतन टाटिया यांनी स्वगणना पूर्ण करून Self Enumeration ID दाखविणाऱ्या नागरिकांना मोफत वॉटर बॉटल देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी स्वगणना मोहिमेत सहभागी व्हावे आणि देशाच्या विकासात आपला सहभाग नोंदवावा, या उद्देशाने त्यांनी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
तसेच बापू डेअरी चे संचालक बापू प्रभाकर महाजन यांनीही नागरिकांना स्वगणनेसाठी प्रोत्साहित करण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला असून स्वगणना पूर्ण करून Self Enumeration ID दाखविणाऱ्या नागरिकांना 200 ग्रॅम मोफत थंडगार लस्सी देण्यात येत आहे. सदर लस्सीचे वितरण लोहाना पेट्रोल पंप जवळील बापू Tea येथे करण्यात येत असून नागरिकांकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याचबरोबर प्रिया बेकरी आणि सुपर शॉप चे संचालक मेहुल राजेंद्र जैन यांनीही स्वगणना मोहिमेत सहभाग घेत नागरिकांना स्वगणनेसाठी प्रोत्साहित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. स्वगणना पूर्ण करून Self Enumeration ID दाखविणाऱ्या नागरिकांना प्रिया बेकरी आणि सुपर शॉप, मेन रोड बाजारपेठ येथे पेस्ट्रीचा आस्वाद देण्यात येत आहे. “स्वगणना ही देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असून प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
भारत सरकारच्या जनगणना 2027 मोहिमेंतर्गत १ मे ते १५ मे 2026 या कालावधीत नागरिकांना स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोहिमेचे आता शेवटचे काही दिवस शिल्लक असून नागरिकांनी तात्काळ स्वगणना पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत बोलताना जनगणना 2027 चे चार्ज अधिकारी रामनिवास झंवर यांनी सांगितले की, “जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया असून शासनाच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. चोपडा शहरातील व्यापारी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी सुरू केलेले उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. अशा सामाजिक सहभागामुळे जनगणना मोहिमेला मोठी गती मिळत आहे.”
ते पुढे म्हणाले, “स्वगणना मोहिमेचे आता शेवटचे काही दिवस शिल्लक असून प्रत्येक नागरिकाने आपली स्वगणना पूर्ण करून Self Enumeration ID प्राप्त करावा. ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांचा थेट सहभाग आहे. इतर व्यापारी, सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांनीही अशाच प्रकारे पुढाकार घेऊन जनजागृती करावी.” जनगणना 2027 ही देशाच्या विकास, नियोजन व प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून सर्व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments