अहिल्यानगर जिल्हा बँकेवर अखेर प्रशासकाची एन्ट्री...बँकिंग वर्तुळात खळबळ..जिल्हा बँकेवर गौतम निकाळजे 'प्रशासक' म्हणून विराजमान. सचिन...
अहिल्यानगर जिल्हा बँकेवर अखेर प्रशासकाची एन्ट्री...बँकिंग वर्तुळात खळबळ..जिल्हा बँकेवर गौतम निकाळजे 'प्रशासक' म्हणून विराजमान.
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- सहकार क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि प्रशासकीय हालचालींनंतर सहकार खात्याने हा मोठा निर्णय घेतला असून, यामुळे जिल्ह्याच्या सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.सहकार खात्याच्या आदेशानुसार,जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांची जिल्हा बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.आदेश प्राप्त होताच निकाळजे यांनी तातडीने बँकेत पोहोचून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.बँकेच्या कामकाजात पारदर्शकता आणणे आणि तांत्रिक त्रुटी दूर करणे ही त्यांच्यापुढील मुख्य आव्हाने असणार आहेत.
नियुक्तीमागची पार्श्वभूमी
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या कामकाजाबाबत आणि काही धोरणात्मक निर्णयांबाबत सहकार विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.या प्रकरणाची दखल घेत सहकार कायद्यातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.प्रशासक नियुक्तीमुळे आता बँकेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त झाले असून,सर्व अधिकार आता प्रशासकांकडे एकवटले आहेत.अहिल्यानगर जिल्हा बँक ही जिल्ह्याची 'आर्थिक वाहिनी' मानली जाते. या बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी दिग्गज राजकीय नेत्यांमध्ये नेहमीच चुरस असते.मात्र,ऐन निवडणुकांच्या तोंडावर किंवा राजकीय समीकरणांच्या काळात प्रशासकाची नियुक्ती झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.बँकेवर प्रशासक नेमला गेल्यामुळे सामान्य खातेदार आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले,तरी तज्ज्ञांच्या मते याचा दैनंदिन व्यवहारांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. उलट, सरकारी निगराणीखाली बँकेचा कारभार अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments