adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तापी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न तापला; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

 तापी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न तापला; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- ...

 तापी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न तापला; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:-  तालुक्यातील दोंडवाडे, तांदलवाडी व निमगव्हाण हद्दीत तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दोंडवाडे येथील रहिवासी गजानन शिवाजी कोळी यांच्या पुढाकाराने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाकडून अधिकृत वाळू ठेका देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन करून रात्री-दिवस मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू आहे. नदीपात्रात १० ते १२ बोटींच्या माध्यमातून वाळू उपसा होत असून, ८ ते १० पोकलँड (जेसीबी,JCB) यंत्रांचा वापर केला जात आहे. एका बोटीमधून दररोज २०० ते २५० ब्रास वाळू उपसा होत असल्याने एकूणच दररोज १५०० ते २००० ब्रास वाळू काढली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


तक्रारीत पुढे नमूद आहे की, ठेकेदाराकडून आवश्यक ती कोणतीही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही. ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच हद्दसीमा दर्शविणारे फलकही लावलेले नाहीत. काही ठिकाणी ५० ते ६० फूट खोल खड्डे करून बोटींच्या सहाय्याने वाळू साठवली जात असून, त्यानंतर ती रात्रीच्या वेळी वाहनांद्वारे वाहतूक केली जात आहे.

याशिवाय, ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा वेगळ्या वेळेतही वाळू उपसा सुरू असल्याचे नमूद करत प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. नदीपात्रात अज्ञात व्यक्तींचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनीही याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. 


ग्रामस्थांच्या मते, या अवैध उत्खननामुळे प्रचंड आवाज होत असून नागरिकांच्या झोपेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नदीपात्रावर अवलंबून असलेल्या शेतीवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. परिसरातील बागायती शेती पूर्णतः नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने भविष्यात मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

तक्रारदारांनी असेही नमूद केले आहे की, पूर्वी गावातील अंत्यसंस्कारासाठी नदीपात्राचा वापर होत होता; मात्र सध्या उत्खननामुळे त्यासाठीही जागा उरलेली नाही. या सर्व प्रकारामुळे तरुण पिढीच्या मनात शासनाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या ९ मे २०२६ पर्यंत प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन कारवाई न केल्यास ग्रामस्थांकडून सत्याग्रह मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल आणि बेमुदत उपोषणाला सुरुवात केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सदर निवेदन सादर करतेवेळी व सह्या दोंडवाडे येथील गजानन कोळी,विनोद धीवर,सागर कोळी,किशोर पाटील,सुधाकर पाटील,पवन कोळी,शुभम इंगळे, वासुदेव पाटील,यांच्या आहेत.

“आमचा शासनाला विरोध नाही; मात्र बेकायदेशीर उत्खनन सहन केले जाणार नाही,” असे स्पष्ट करत संबंधितांवर तातडीने चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

No comments