adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ऑल इंडिया केमिस्ट बंदला चोपड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद शहरासह ग्रामीण भागातील सर्व औषध दुकाने बंद; विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

 ऑल इंडिया केमिस्ट बंदला चोपड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद शहरासह ग्रामीण भागातील सर्व औषध दुकाने बंद; विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्च...

 ऑल इंडिया केमिस्ट बंदला चोपड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

शहरासह ग्रामीण भागातील सर्व औषध दुकाने बंद; विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या वतीने औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला चोपडा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला.

ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिले जाणारे अव्यावसायिक डिस्काउंट थांबवावे तसेच बनावट औषधांपासून देश वाचवावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता. शासनापर्यंत या मागण्या पोहोचाव्यात यासाठी चोपड्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर केमिस्ट एकतेच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत मोर्चा शहरातून तहसील कार्यालयावर पोहोचला. तेथे महसूल नायब तहसीलदार प्रकाश धनगर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

जळगाव जिल्हा औषधी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील भाऊ भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी मोर्चाचे नियोजन केले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच शहर व ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने औषध विक्रेते उपस्थित होते.

औषध विक्रेत्यांची प्रतिक्रिया

“आजच्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. हा बंद केवळ औषध विक्रेत्यांच्या हितासाठी नसून समाजहितासाठीदेखील आहे. आजची युवा पिढी ऑनलाईन पद्धतीने औषधे खरेदी करत असून काही वेळा नशा करणारी, कामोत्तेजक किंवा गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे सहज उपलब्ध होत आहेत. डॉक्टर व औषध विक्रेत्यांच्या मार्गदर्शनाशिवाय अशी औषधे घेतली जात असल्याने समाजावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणल्यास युवा पिढीवरील दुष्परिणाम रोखता येतील,”

अशी प्रतिक्रिया गणपूर येथील औषध विक्रेते संजय पाटील यांनी व्यक्त केली.

No comments