शांतता राखण्यासाठी प्रशासनाचे कठोर पाऊल लातूरमध्ये शस्त्रे व मिरवणुकांवर बंदी! जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेसाठी कडक आदेश लागू लातूरकरांसाठी ...
शांतता राखण्यासाठी प्रशासनाचे कठोर पाऊल लातूरमध्ये शस्त्रे व मिरवणुकांवर बंदी!
जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेसाठी कडक आदेश लागू
लातूरकरांसाठी महत्त्वाची सूचना; नियमांचे पालन करा
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
हा आदेश 20 मे 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते 3 जून 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या काळात कोणालाही शस्त्रे, तलवारी, भाले, लाठ्या, बंदुका, सुरे किंवा इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच स्फोटक पदार्थ, दगड, ज्वलनशील वस्तू किंवा इतर धोकादायक साहित्य जमा करणे अथवा वाहून नेणेही बंद करण्यात आले आहे.
याशिवाय जिल्ह्यात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणूक काढण्यास, घोषणाबाजी करण्यास तसेच भडकावू भाषणे किंवा आक्षेपार्ह फलक, चिन्हे व साहित्य प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अंत्ययात्रा, विवाह समारंभ तसेच शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना या आदेशातून सूट राहणार आहे. धार्मिक मिरवणूक, सभा, मोर्चा किंवा उपोषणासाठी संबंधित पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे.
जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments