बाबा नगर, किल्ला परिसर व शिवाजीनगर भागात स्वतंत्र नवीन अंगणवाडी सुरू करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया...
बाबा नगर, किल्ला परिसर व शिवाजीनगर भागात स्वतंत्र नवीन अंगणवाडी सुरू करा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील यांची महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
यावल प्रतिनिधी : भरत कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल शहरातील बाबा नगर, किल्ला परिसर व शिवाजीनगर भागात स्वतंत्र नवीन अंगणवाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील यांनी महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर भागात गेल्या काही वर्षांत लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून लहान बालकांची संख्या देखील वाढत आहे. मात्र या परिसरात स्वतंत्र अंगणवाडीची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना दूर अंतरावरील अंगणवाडीत जावे लागते. त्यामुळे लहान मुलांना, गरोदर महिलांना व स्तनदा मातांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः बालकांचे पोषण, आरोग्य तपासणी, लसीकरण, पूर्व प्राथमिक शिक्षण तसेच महिलांसाठीच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत असल्याने अनेक लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
या भागात तातडीने नवीन अंगणवाडी सुरू झाल्यास परिसरातील बालकांचे शिक्षण, पोषण व महिलांचे आरोग्य यांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास सौ. छाया पाटील यांनी व्यक्त केला. तसेच अंगणवाडी सुरू करण्यासाठी नगरपालिकास्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments