पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार : ३१ मे रोजी वितरण. चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हा पुरस्कार उत्साहात व पारदर्श...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार : ३१ मे रोजी वितरण.
चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हा पुरस्कार उत्साहात व पारदर्शक पद्धतीने वितरित करावा,
असे आवाहन सकल धनगर मल्हार सेना चोपडा शहर अध्यक्ष नंदलाल धनगर यांनी केले आहे
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा : ग्रामीण भागामध्ये महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ मे रोजी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या महत्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करत सकल धनगर मल्हार सेना शहर अध्यक्ष चोपडा नंदलाल नारायण धनगर यांनी चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हा पुरस्कार उत्साहात व पारदर्शक पद्धतीने वितरित करावा, असे आवाहन केले आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक विकास, शिक्षण, आरोग्य, बचत गट, बालविवाह प्रतिबंध, स्वच्छता अभियान यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना या पुरस्कारामुळे नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बबीता नंदलाल धनगर, माजी सरपंच वर्डी, ता. चोपडा, जि. जळगाव यांच्या सामाजिक व महिला विकास क्षेत्रातील कार्याचाही गौरव करण्यात आला. ग्रामीण भागात महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या महिलांना शासनाच्या या उपक्रमामुळे न्याय व सन्मान मिळणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शासन निर्णयानुसार पुरस्कारासाठी निवड झालेल्या महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ तसेच रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर योग्य व पात्र महिलांची निवड व्हावी यासाठी संबंधित समित्यांनी पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी देखील नंदलाल धनगर यांनी केली आहे.
चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ३१ मे रोजी महिला सन्मान कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करून महिलांच्या कार्याचा गौरव करावा, असे आवाहन शेवटी करण्यात आले.

No comments