विद्यापीठात रोजदारी कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शकपणे करण्याची मागणी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जळगांव जिल...
विद्यापीठात रोजदारी कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शकपणे करण्याची मागणी
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष विजय सपकाळे यांचे कुलगुरूंना निवेदन
जळगांव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रोजदारी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून स्थानिक सुशिक्षित तरुणांना प्राधान्य द्यावे,अशी मागणी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे, संस्थापक तथा महासचिव कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खानदेश प्रमुख राजेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांच्या समन्वयातून कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रोजदारी कर्मचाऱ्यांची भरती ठेकेदारामार्फत केली जाते. संबंधित युवकांची टेस्ट घेऊन निवड प्रक्रिया राबवली जात असली तरी स्थानिक युवकांना अपेक्षित प्राधान्य मिळत नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी संघटनेने केली आहे.
यावेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे पदाधिकारी यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. संबंधित कंपन्यांना काम देताना कोणत्या निकषांचा अवलंब केला जातो, कंपन्यांवर विद्यापीठाचे नियंत्रण आहे का, तसेच भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती व जमातींना प्राधान्य दिले जाते का, याबाबत माहिती मागविण्यात आली आहे.
तसेच विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पाळण्यात येणाऱ्या अटी, शर्ती, निविदा प्रक्रिया आणि संबंधित कंपन्यांच्या कामकाजावर असलेले नियंत्रण याबाबतही सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेने माहिती अधिकार अंतर्गत यासंदर्भात पुढील पाठपुरावा करण्याचा इशाराही दिला आहे.

No comments