भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा (श्वान) वाढता उपद्रव; तातडीने उपाययोजनांची मागणी भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भुसावळ शहरात...
भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा (श्वान) वाढता उपद्रव; तातडीने उपाययोजनांची मागणी
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा (श्वान) वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर समस्या बनला असून, यावर तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची (श्वान) संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा मोकाट कुत्र्यांनी (श्वान) नागरिकांवर व शालेय विद्यार्थ्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून काही जण जखमीही झाले आहेत.
यासोबतच नुकत्याच एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने शहरात असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्यापूर्वीच नगर परिषद प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः शाळा परिसरातील मोकाट कुत्र्यांचा (श्वान) बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा, यावर भर देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन कुत्र्यांचे (श्वान) निर्बिजीकरण, स्थलांतर तसेच इतर आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना, महाराष्ट्र राज्य संघटनेचे खानदेश संपर्कप्रमुख राजेंद्र त्र्यंबक वानखेडे तसेच तालुकाध्यक्ष मिलिंद रामचंद्र सोनवणे यांनी सादर केले आहे.

No comments