फैजपूरातील दलित वस्त्यांवर पाणीटंचाईचे संकट; नवीन पाइपलाइन टाकण्याची मागणी, महिलांचा संताप इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
फैजपूरातील दलित वस्त्यांवर पाणीटंचाईचे संकट; नवीन पाइपलाइन टाकण्याची मागणी, महिलांचा संताप
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरातील अनेक दलित वस्त्यांमध्ये गेल्या २५ ते ३० वर्षांपासून जुनी व जीर्ण झालेली पाणीपुरवठा पाइपलाइन अद्याप बदलण्यात आलेली नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप “भिमपुत्र ग्रुप”च्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात फैजपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून तातडीने नवीन पीव्हीसी पाइपलाइन टाकून नियमित व मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पाण्यासाठी दररोज होणारी धावपळ, अपुरा पाणीपुरवठा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असेल तर प्रशासन नेमकं करतंय काय? असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला.
निवेदनात नमूद केल्यानुसार, नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, कुरेशी मोहल्ला, भोई वाडा, पठाण वाडी तसेच श्रीराम पेठ (दक्षिण बाहेरपेठ) परिसरातील अनेक भागांमध्ये अत्यंत जुनी पाइपलाइन असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गंज साचला परिणामी नागरिकांना पुरेशा दाबाने व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत किंवा अन्य निधीतून दर्जेदार नवीन पीव्हीसी पाइपलाइन टाकून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली
दरम्यान, दिलेल्या निवेदनाची दखल प्रशासनाने तातडीने न घेतल्यास येत्या काही दिवसांत फैजपूर नगरपरिषदे समोर आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही भिमपुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्रीवर्धन (पप्पू) मेढे यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments