बियर शॉपच्या नावाखाली देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री; तात्काळ कारवाईची जनतेची मागणी पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची नागरिकांची अपेक्षा य...
बियर शॉपच्या नावाखाली देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री; तात्काळ कारवाईची जनतेची मागणी
पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची नागरिकांची अपेक्षा
यावल (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
– यावल तालुक्यातील फैजपूर शहरातील बसस्थानक परिसरात एका बियर शॉपच्या नावाखाली इंग्लिश, देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित दुकानास केवळ बियर विक्रीचा परवाना असतानाही विविध प्रकारच्या मद्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी नियमांना धाब्यावर बसवून विविध प्रकारची देशी-विदेशी दारू जादा दराने विक्री केली जात असून, दारू पिणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. प्रत्यक्षात अशा ठिकाणी बसून मद्यपान करण्यास परवानगी नसतानाही खुलेआम मद्यपान सुरू असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या परिसरात लग्न समारंभासाठी शुभदिव्य लॉन्स व सुमंगल लॉन्सकडे जाणारा प्रमुख मार्ग असल्याने नागरिक, महिला व वरातींना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. मद्यधुंद व्यक्तींकडून गोंधळ व धिंगाणा घातला जात असल्याने परिसरातील वातावरण बिघडत असल्याची तक्रार स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दारूबंदी विभाग व संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून, स्थानिक पोलिसांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तरी संबंधित बियर शॉपवर तात्काळ कारवाई करून अवैध प्रकार बंद करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, जर देशी-विदेशी दारू विक्री त्वरित बंद झाली नाही, तर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

No comments