adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तापी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन पुन्हा जोमात; महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

तापी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन पुन्हा जोमात; महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह  चोपडा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

तापी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन पुन्हा जोमात; महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह 

चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील तापी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दोंडवाडे, तांदलवाडी, निमगव्हाण परिसरासह तापी नदीकाठावरील भागात रात्रंदिवस पोकलेन, जेसीबी, पाणबुडी व मोठ्या बोटींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
यापूर्वी विविध वृत्तपत्रे, डिजिटल माध्यमे व युट्युब पोर्टलच्या माध्यमातून संबंधित प्रकार महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाकडून काही प्रमाणात कारवाई करण्यात आल्याचे सांगितले गेले; मात्र ती केवळ नावापुरतीच असल्याचा आरोप आता नागरिकांमधून होत आहे. काही दिवस शांत असलेला प्रकार पुन्हा अधिक व्यापक स्वरूपात सुरू झाल्याचे सांगितले जात असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची भावना जनतेमध्ये वाढताना दिसून येत आहे.
स्थानिकांच्या मते, नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असून, नदीकाठावरील शेती, पाण्याची पातळी व जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या वाहनांच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, गावांतील शांतता भंग होत असल्याची तक्रार आहे.
दरम्यान, वडती–विष्णपूर मार्गे सातपुडा परिसराच्या दिशेने गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या सुमारास दोन पिवळ्या रंगाचे डंपर भरधाव वेगाने मुरूम वाहतूक करताना दिसत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. संबंधित वाहतूक पहाटे तीन वाजल्यापासून ते सायंकाळपूर्व वेळेतच होत असल्याने सदर प्रकार कायदेशीर आहे की बेकायदेशीर, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या वाहनांमुळे रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरिकांमध्ये असा सवाल उपस्थित केला जात आहे की, जर तापी नदीपात्रातून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची वाहतूक होत असेल, तर महसूल विभाग, खनिकर्म विभाग व संबंधित यंत्रणांकडून प्रभावी नियंत्रण का ठेवले जात नाही? शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा असून, यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्नही आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
विशेष म्हणजे, अवैध उत्खननासंदर्भात वारंवार तक्रारी, बातम्या व व्हिडिओ समोर येत असतानाही प्रशासनाकडून ठोस व सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने शासन व महसूल प्रशासनावरील जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. “प्रशासन केवळ कारवाईचे दिखावे करत आहे का?” असा संतप्त सवालही आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक शेतकरी, नागरिक व सामाजिक स्तरातून तापी नदीपात्रातील अवैध उत्खननावर तातडीने संयुक्त मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी विशेष पथक नियुक्त करून बोटी, पाणबुड्या, पोकलेन व अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आता या गंभीर प्रकरणाची दखल महसूल प्रशासन, खनिकर्म विभाग व पोलीस प्रशासन कोणत्या स्वरूपात घेतात आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई करतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे.

No comments