जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह नियमबाह्य पद्धतीने पदभरती झाल्याच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश सा...
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
नियमबाह्य पद्धतीने पदभरती झाल्याच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश भोळे याच्या तक्रारीची दखल
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत करण्यात आलेल्या पदभरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित भरती ही गुणवत्तेनुसार न करता नियमबाह्य पद्धतीने झाल्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश कडू भोळे यांनी केली होती.
या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई येथील सहसंचालक (अतांत्रिक) राजेंद्र भालचंद्र भाळेराव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना पत्र पाठवून पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र व “आपला दवाखाना” अंतर्गत आरोग्य सेवक (MPW-Male) तसेच स्टाफ नर्स पुरुष/महिला पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र जाहिरातीतील अटी व शर्तींचे उल्लंघन करून गुणवत्तायादी न प्रसिद्ध करता भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानाने हे प्रकरण गांभीर्याने घेत संबंधित पदभरती ही जिल्हास्तरावर झालेली असल्याचे नमूद करत जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य ती चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आवश्यक कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी होण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
No comments