प्रेरणादायी यशोगाथा : घाडवेलच्या महेंद्र पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर निवड चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चो...
प्रेरणादायी यशोगाथा : घाडवेलच्या महेंद्र पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर निवड
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील घाडवेल येथील अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या महेंद्र मीनाबाई प्रकाश पाटील यांनी आपल्या अथक परिश्रम,जिद्द आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम पी एस सी) परीक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“Success is not for the chosen few, but for the few who choose not to give up.” हा इंग्रजी विचार त्यांच्या प्रवासाला अगदी चपखल लागू पडतो. घाडवेल येथील धनवाडीकर कुटुंबातील प्रकाश नारायण पाटील व मीनाबाई प्रकाश पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेल्या महेंद्र पाटील यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे कष्ट, त्याग आणि संघर्ष यांचा मोठा वाटा आहे.
रोजंदारी व मोलमजुरी करून आई-वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण दिले.अत्यंत कठीण परिस्थितीत वाढत असताना महेंद्र पाटील आणि त्यांच्या भावाने परिस्थितीची जाणीव ठेवत शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांच्या भावाची २०१७ साली पोलीस दलात निवड झाली, तर महेंद्र पाटील यांनीही २०१४ साली पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवेत प्रवेश केला.
घाडवेल गावात सुमारे ५० च्या आसपास तरुण पोलीस दलात कार्यरत असल्याने स्पर्धात्मक वातावरण होते. मात्र “Low aim is crime” ही भूमिका मनाशी बाळगून त्यांनी फक्त पोलीस होण्यावर समाधान न मानता पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) होण्याचे मोठे स्वप्न पाहिले आणि ते साकार केले.
एफ वाय बी एस सी व एस वाय बी एस सी. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय)होण्याची इच्छा निर्माण झाली होती. टी वाय बी एस सी.मध्ये असताना त्यांनी पोलीस भरतीत यश मिळवले, परंतु ते त्यांच्यासाठी अंतिम ध्येय नव्हते. त्यांनी वाय सी एम मधून पदवी पूर्ण करत नोकरी सांभाळली, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि मागील चार वर्षे सातत्याने अभ्यास सुरू ठेवला.
विशेष म्हणजे, लहान मुलाची जबाबदारी सांभाळत त्यांनी कठोर परिश्रम घेतले. अनेक अडचणी, थकवा आणि आव्हाने येऊनही त्यांनी कधीही हार मानली नाही. अखेर त्यांच्या या मेहनतीला यश आले आणि त्यांच्या मुलाच्या पहिलीत प्रवेशाच्या सुमारासच त्यांची पोलीस (पीएसआय)पदावर निवड झाली.
पिंपळेसीम येथील ईश्वर मणिलाल पाटील यांचे भाचे तसेच मोहिदे येथील अशोक धनसिंग पाटील यांचे जावई असलेल्या महेंद्र पाटील यांची ही यशोगाथा केवळ वैयक्तिक यश नसून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचे जिवंत उदाहरण आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.त्यांची ही प्रेरणादायी कहाणी समाजातील तरुण-तरुणींना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments