काकीनाडा टाउन-हिसार एक्सप्रेसच्या नियमित सेवेला धरणगावात उत्साहात हिरवा झेंडा धरणगाव रेल्वे प्रवाशांना मोठी दिलासादायक भेट; राजेंद्र वाघ (प...
काकीनाडा टाउन-हिसार एक्सप्रेसच्या नियमित सेवेला धरणगावात उत्साहात हिरवा झेंडा
धरणगाव रेल्वे प्रवाशांना मोठी दिलासादायक भेट; राजेंद्र वाघ (पत्रकार)
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : धरणगाव शहर व तालुक्यातील रेल्वे प्रवाश्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक ठरणारी 07717/18 स्पेशल ट्रेनचे 17295/96 काकीनाडा टाउन-हिसार एक्सप्रेस या नियमित रेल्वे सेवेमध्ये रूपांतर करण्यात आले असून, या बहुप्रतिक्षित रेल्वे सेवेच्या उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम धरणगाव रेल्वे स्थानकावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दीर्घ काळापासून धरणगावसह परिसरातील रेल्वे प्रवाशांकडून या मार्गावरील रेल्वे सेवा नियमित करण्याची मागणी होत होती. अखेर रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल घेत नियमित सेवा सुरू केल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सेवेमुळे महाराष्ट्रासह उत्तर व दक्षिण भारताशी रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून, विद्यार्थी, व्यापारी, नोकरीधारक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा लाभ मिळणार आहे. स्वागत प्रसंगी पत्रकार राजेंद्र वाघ यांनी सांगीतले की, प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य बघता धरणगाव शहरासह जिल्हाभरातील रेल्वे प्रवाशांना मोठी दिलासादायक भेट मिळाल्याचे पत्रकार श्री.वाघ यांनी स्पष्ट केले. यावेळी नियमित रेल्वे सेवेचे उद्घाटन व लोको पायलट मॅन अरविंद टी.आर. व असिस्टंट लोको पायलट तुलसीराम मीना यांचे स्वागत लोकमतचे पत्रकार भागीरथ माळी, शौर्य मराठीचे पत्रकार राजेंद्र वाघ तसेच विजयकुमार शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचे स्वागत केले तसेच उधना हेडक्वार्टरचे सिनीयर लोको पायलट मेल अरविंद टी. आर. व ॲसिस्टंट लोको पायलट तुळशीराम मीणा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी, किरण वाणी, डॉ. पंकज अमृतकर, डॉ. स्वप्नील पाटील, आनंद वाजपेयी, सुदाम चौधरी यांच्यासह रेल्वे प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभादरम्यान उपस्थितांनी रेल्वे सेवेच्या नियमितीकरणाबद्दल आनंद व्यक्त करत ही सेवा धरणगावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. विशेषतः दूरवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या रेल्वे सेवेचा मोठा फायदा होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. धरणगाव रेल्वे स्थानक परिसरात उद्घाटनावेळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे आगमनानंतर प्रवासी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी प्रवासी मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवर, रेल्वे कर्मचारी, पत्रकार व सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

No comments