adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निसर्गाच्या तडाख्यात बळीराजा उध्वस्त; पीकविमा, पंचनामे आणि मदतीवर शेतकऱ्यांचा संताप’; पीकविमा कंपन्या, दलाल आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी

निसर्गाच्या तडाख्यात बळीराजा उध्वस्त; पीकविमा, पंचनामे आणि मदतीवर शेतकऱ्यांचा संताप  पीकविमा कंपन्या, दलाल आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी ...

निसर्गाच्या तडाख्यात बळीराजा उध्वस्त; पीकविमा, पंचनामे आणि मदतीवर शेतकऱ्यांचा संताप

 पीकविमा कंपन्या, दलाल आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:- राज्यातील शेतकरी सध्या अस्मानी - सुलतानी संकटाच्या दुहेरी विळख्यात सापडला असून पीकविमा, पंचनामे आणि नुकसानभरपाईच्या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. सततची नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असताना मदत व विमा दाव्यांच्या प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी नेते एस. बी. नाना पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पीकविमा कंपन्या, दलाल आणि संबंधित यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "शेतकऱ्यांच्या मढ्यावरचे लोणी खाण्याची स्पर्धा सुरू असून पंचनामा आणि मदत केवळ नावापुरती राहिली आहे," अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. 

शेतकरी नेते एस. बी. नाना पाटील 

त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर ऑनलाइन तक्रारी दाखल करूनही संबंधित प्रतिनिधी घटनास्थळी उशिराने पोहोचत आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्ष लागवडीपेक्षा कमी क्षेत्राची नोंद करण्यात येत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई आणि विमा दाव्यांवर परिणाम होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याऐवजी काही ठिकाणी "सरकार भरपूर मदत करते" असे सांगून त्यांच्या वेदनांची खिल्ली उडवली जात असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. आगामी काळात ‘अल निनो’च्या संभाव्य परिणामांमुळे शेतीसमोरील संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.

"आज शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?" असा सवाल उपस्थित करत एस. बी. नाना पाटील यांनी प्रशासनाला तातडीने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी पुत्र आजही संयम राखून आहेत. मात्र गावागावांत असंतोष वाढत असून वेळेत न्याय आणि मदत मिळाली नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे पंचनामे, पीकविमा दावे आणि नुकसानभरपाई प्रक्रियेत पारदर्शकता व गती आणून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. "अस्मानी संकटाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन, प्रशासन आणि विमा कंपन्यांनी संवेदनशीलतेने काम करण्याची वेळ आली आहे," असे मतही निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.

No comments