चोपडा शहर पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’ यशस्वी; अवैध धंदे, अंमली पदार्थ व वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- ...
चोपडा शहर पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’ यशस्वी; अवैध धंदे, अंमली पदार्थ व वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा :- दि.५ जून रोजी मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार चोपडा शहर पोलीस स्टेशनतर्फे ‘ऑल आऊट ऑपरेशन’ प्रभावीपणे राबविण्यात आले. या विशेष मोहिमेदरम्यान गुन्हेगारी नियंत्रण, अवैध धंद्यांवर आळा घालणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलीस पथकाने अवैध देशी दारू विक्री व हातभट्टीविरोधात धडक मोहीम राबवत ७ गुन्हे दाखल केले. जुगार प्रकरणात ४ केसेस नोंदवून संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात आली. तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये २ गुन्हे दाखल करण्यात आले. संशयित व्यक्तींविरुद्ध बी.पी. ॲक्ट कलम १२२ अंतर्गत १ गुन्हा नोंदविण्यात आला. ऑपरेशनदरम्यान परिसरातील ४ धाब्यांचीही कसून तपासणी करण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. विना परवाना वाहन चालविणारे, ट्रिपल सीट प्रवास करणारे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे तसेच विना नंबर प्लेट वाहनधारक अशा एकूण ३० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ३ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. याच मोहिमेदरम्यान ६ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. न्यायालयीन प्रक्रियेला गती देत ५ प्रलंबित वॉरंट बजावण्यात आले तसेच ३ ट्रॅव्हल्स वाहनांची तपासणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, शोध मोहिमेदरम्यान चोपडा शहर पोलिसांनी एक बेपत्ता महिला शोधून काढत संवेदनशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली. चोपडा शहर पोलीस स्टेशनने राबविलेल्या या सर्वंकष ‘ऑल आऊट ऑपरेशन’मुळे अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर प्रभावी अंकुश बसल्याचे दिसून येत आहे.






No comments