लोकमत सरपंच अवॉर्ड 2026 ने गौरव; विचखेडा-धुपे खुर्दचे सरपंच रवींद्र बाळकृष्ण पाटील यांना मानाचा पुरस्कार पायाभूत सुविधांमधील उत्कृष्ट कार्य...
लोकमत सरपंच अवॉर्ड 2026 ने गौरव; विचखेडा-धुपे खुर्दचे सरपंच रवींद्र बाळकृष्ण पाटील यांना मानाचा पुरस्कार
पायाभूत सुविधांमधील उत्कृष्ट कार्याची दखल; पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा: लोकमत समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या लोकमत सरपंच अवॉर्ड 2026 मध्ये पायाभूत सुविधा विभागातील मानाचा पुरस्कार चोपडा तालुक्यातील विचखेडा-धुपे खुर्द ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री. रवींद्र बाळकृष्ण पाटील यांना प्रदान करण्यात आला. गावाच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरपंच रवींद्र पाटील यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच विविध विकासकामांच्या माध्यमातून गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. पायाभूत सुविधांच्या उभारणीत केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे आणि पारदर्शक प्रशासनामुळे ग्रामपंचायतीने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सरपंच रवींद्र पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे ४०० ग्रामपंचायतींमधून विविध निकषांच्या आधारे पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये उत्कृष्ट विकासकामे आणि ग्रामविकासातील योगदानाच्या जोरावर रवींद्र पाटील यांनी हा मानाचा पुरस्कार प्राप्त केला.
या गौरव सोहळ्याप्रसंगी लोकमतचे अधिकारी दत्तात्रय महाजन, गोपाळ कोळी यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच रवींद्र पाटील यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
लोकमत सरपंच अवॉर्ड 2026 प्राप्त करून विचखेडा-धुपे खुर्द ग्रामपंचायतीचा नावलौकिक उंचावणारे सरपंच श्री. रवींद्र बाळकृष्ण पाटील यांचे सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन होत आहे.

No comments