adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अडीच महिन्यांनंतर १२ वर्षीय गणेशचा मृतदेह दफनस्थळावरून बाहेर; संशयास्पद मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण

अडीच महिन्यांनंतर १२ वर्षीय गणेशचा मृतदेह दफनस्थळावरून बाहेर; संशयास्पद मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण  विकास पाटील धरणगाव  संपादक हेमकांत ग...

अडीच महिन्यांनंतर १२ वर्षीय गणेशचा मृतदेह दफनस्थळावरून बाहेर; संशयास्पद मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण 


विकास पाटील धरणगाव 

संपादक हेमकांत गायकवाड 

 जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील रेल गावातील १२ वर्षीय गणेश नवल पाटील यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. मृत्यू झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी गणेशचा मृतदेह दफनस्थळावरून बाहेर काढण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या अहवालातून गणेशच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गणेश नवल पाटील याचा १५ मार्च रोजी क्रिकेट खेळत असताना संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. जुन्या वादातून एका मित्राने क्रिकेट बॅटने छातीत वार केल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप वडील नवल पाटील यांनी केला होता. मात्र सुरुवातीच्या तपासात स्पष्ट निष्कर्ष न निघाल्याने त्यांनी मुलाला न्याय मिळावा यासाठी पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला.
अखेर वडिलांच्या मागणीची दखल घेत पोलिसांनी प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला. त्यानुसार आज फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक, पोलीस अधिकारी आणि धरणगावचे तहसीलदार यांच्या उपस्थितीत गावाजवळील नदीकाठी पुरण्यात आलेला गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाच्या देखरेखीखाली आणि इन-कॅमेरा पद्धतीने पार पडली.
मृतदेहाचा सांगाडा पाहताच वडील नवल पाटील यांना अश्रू अनावर झाले. आपल्या एकुलत्या एक मुलासाठी न्याय मिळावा, यासाठी त्यांनी गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ अथक प्रयत्न केले आहेत.
यानंतर मृतदेह पुढील तपासणी आणि सखोल शवविच्छेदनासाठी धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. आता शवविच्छेदन अहवालातून गणेशच्या मृत्यूमागील सत्य समोर येणार का, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.

No comments