मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वारोली शिव (म.प्र.) ते अंतुर्ली रस्ता कामाला अखेर सुरुवात किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायक...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वारोली शिव (म.प्र.) ते अंतुर्ली रस्ता कामाला अखेर सुरुवात
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली ता.मुक्ताईनगर: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वारोली शिव (मध्य प्रदेश) ते अंतुर्ली या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या कामाबाबत स्थानिक नागरिक व ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
कार्यकारी अभियंता, उपअभियंता तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर वारोली मध्य प्रदेश सीमेपासून कामाला सुरुवात झाली. या रस्त्याच्या कामामध्ये मातीकाम, ग्रॅन्युलर सब-बेस (GSB), क्रशर खडीकरणाचा थर, मुरूम टाकणे, पाणी मारून दबाई करणे, डांबरीकरण, रिमिक्स हॉट मिक्स कार्पेट, साईड पट्ट्या तसेच व्हाईट टॉपिंग काँक्रीट पेव्हमेंट आदी कामांचा समावेश आहे.
रस्त्याचे रखडलेले काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्त्याची सर्व कामे मंजूर अंदाजपत्रकानुसार व दर्जेदार पद्धतीने व्हावीत यासाठी माजी सरपंच कैलास दुट्टे, अनिल वाडीले, शेख भैय्या शेख करीम आणि किरण धायले यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी काम वेळेत पूर्ण होऊन उच्च प्रतीचे व्हावे, अशा सूचना संबंधितांना करण्यात आल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता राठोड साहेब, उपअभियंता सी. व्ही. महाजन साहेब आणि सेक्शनल इंजिनियर राहुल वाडीले यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रस्त्याची रुंदी, साईड पट्ट्या, काँक्रीटीकरण, योग्य दबाई व पाणी मारण्याची प्रक्रिया यासह सर्व कामे दर्जेदार पद्धतीने पार पडावीत, यासाठी अधिकाऱ्यांनी नियमितपणे साइटला भेट देऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी करण्यात आली.
तसेच संबंधित कंत्राटदाराने कोणतीही दिरंगाई न करता मंजूर इस्टिमेटनुसार रस्त्याची पूर्ण रुंदी घेऊन काम पूर्ण करावे, अशी अपेक्षाही स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.


No comments