पुरावा नकोच..."पतीचा जीव घेतला..पत्नीवरही सपासप वार..अहिल्यानगर शहर हादरवणाऱ्या 'लक्ष्मण काळे' खुनाचा एलसीबीने लावला थरारक छडा...
पुरावा नकोच..."पतीचा जीव घेतला..पत्नीवरही सपासप वार..अहिल्यानगर शहर हादरवणाऱ्या 'लक्ष्मण काळे' खुनाचा एलसीबीने लावला थरारक छडा..'रानटी'सह ४ जणांना ठोकल्या बेड्या
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- शहरातील कवडे मळा परिसरात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता.जमिनीच्या वादातून मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पती-पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आले.यामध्ये लक्ष्मण मार्तंड काळे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला,तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या.या खून प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने अवघ्या २४ तासांच्या आत लावला असून,देहेरे शिवारातून ४ सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.मूळचे काळेगाव अमरापूर (ता. शेवगाव) येथील रहिवासी असलेले लक्ष्मण मार्तंड काळे हे १५ जूनच्या रात्री नगर-कल्याण रोडवरील जाधव मळा (कवडे मळा रोड) येथे त्यांचे नातेवाईक प्रशांत भोसले यांच्या शेडच्या वऱ्हाड्यात झोपलेले होते.रात्री ११ ते पहाटे ३ वाजेच्या सुमारास,काळोखाचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोर हातात कुऱ्हाड घेऊन तिथे घुसले.
काही समजण्याच्या आतच आरोपींनी लक्ष्मण काळे यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणे वार केले.यावेळी त्यांच्या शेजारी झोपलेल्या फिर्यादी पत्नी अचानक जाग्या झाल्या.नराधमांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या तोंडावरही कुऱ्हाडीने वार करून त्यांना जीवे मारण्याचा थरारक प्रयत्न केला.या हल्ल्यात लक्ष्मण काळे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तात्काळ तपासाचे व आरोपींना शोधण्याचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी सपोनि हरीश भोये,पोलीस अंमलदार शाहिद शेख,सुनील पवार,अरविंद भिंगारदिवे, गणेश धोत्रे यांसह महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे,सोनल भागवत आणि पथकातील इतर सहकाऱ्यांचे विशेष पथक तयार केले.एलसीबीचे पथक घटनास्थळाची पाहणी करत असतानाच,त्यांना तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. सदरचा गुन्हा विळद येथील लक्की वैराळ,करण शिंदे आणि त्यांच्या साथीदारांनी केला असून ते सध्या देहेरे गावातील खंडोबाचा मळा येथे लपून बसले आहेत.माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता देहेरे शिवारात सापळा रचला.पोलिसांची चाहूल लागताच संशयास्पदरीत्या थांबलेल्या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला,मात्र एलसीबीच्या पथकाने अत्यंत शिताफीने व थरारक पाठलाग करून चौघांना जागेवरच बेड्या ठोकल्या.लक्की उर्फ बाबा राहुल वैराळ (वय १९ वर्षे,रा.विळद घाट, अहिल्यानगर),करण विशाल शिंदे (वय १८ वर्षे,रा. गवळीवाडा,विळद, अहिल्यानगर),गणेश उर्फ गणीबाबा मनोज चावरे (वय २२ वर्षे,रा.देवळाली प्रवरा, ता. राहुरी),विशाल उर्फ रानटी रामचंद्र उमाप (वय १८ वर्षे, रा.विळदघाट,मूळ रा. पाथर्डी)
(या गुन्ह्यात करण नंतर काळे आणि आदित्य भाकरे (रा. विळद) हेदेखील सामील असल्याची माहिती समोर आली.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून आणि विश्वासात घेऊन चौकशी केली असता,मुख्य आरोपी लक्की उर्फ बाबा वैराळ याने गुन्ह्याची कबुली दिली.जमिनीच्या जुन्या वादातूनच हा संपूर्ण खुनाचा कट रचण्यात आला होता आणि त्यानुसारच लक्ष्मण काळे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचे आरोपींनी कबूल केले.पोलिसांनी आरोपींकडून २०,००० रुपये किमतीचा पोवा (Pova) कंपनीचा मोबाईल आणि सिमकार्ड असा एकूण २०,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.पकडण्यात आलेल्या चारही आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांना रीतसर अटक करण्यात आली आहे.कोतवाली पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावल्यामुळे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी एलसीबीच्या पथकाचे कौतुक केले आहे.

No comments