माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेब मैदानात; ५ जुलैपासून उपोषणाचा इशारा पुणे, प्रतिनिधी (संपादक -:- हेमक...
माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेब मैदानात; ५ जुलैपासून उपोषणाचा इशारा
पुणे, प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासनाने १२ जून २०२६ रोजी लागू केलेल्या माहितीचा अधिकार नियम २०२६ मुळे राज्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या नियमांतील अनेक तरतुदींमुळे माहितीचा अधिकार कायद्याचा मूळ उद्देश, पारदर्शकता आणि नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार बाधित होत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूह, पुणे यांच्या शिष्टमंडळाने दिनांक १७ जून २०२६ रोजी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनाच्या १२ जून २०२६ च्या राजपत्रातील माहितीचा अधिकार नियम २०२६ त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या नियमांमधील विविध त्रुटी आणि माहिती अधिकार कायद्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम यांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.
यावेळी अण्णा हजारे यांनी कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेत, “माहिती अधिकार कायद्याला घातक ठरणाऱ्या सर्व त्रुटी लेखी स्वरूपात द्या. त्याबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे,” असे आश्वासन दिले. त्यानंतर ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाने नियमांतील आक्षेपार्ह व नागरिकविरोधी बाबींचे सविस्तर निवेदन अण्णा हजारे यांच्याकडे सादर केले. या निवेदनातील सर्व मुद्द्यांचा विचार करून अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठविले असून त्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मांडलेल्या सर्व प्रमुख आक्षेपांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगत, नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या तरतुदी स्वीकारल्या जाणार नाहीत, अशी भूमिका स्पष्ट केली. शासनाने नियमांतील त्रुटी दूर केल्या नाहीत तर ५ जुलै २०२६ पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिर परिसरात बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. माहितीचा अधिकार कायदा देशात प्रभावीपणे लागू व्हावा यासाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता संघर्ष करणारे पद्मभूषण अण्णा हजारे आजही नागरिकांच्या अधिकारांसाठी ठामपणे उभे राहत असल्याने राज्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मोठा आधार मिळाला आहे. ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाने अण्णा हजारे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले असून माहितीचा अधिकार कायद्याची मूळ भावना जपण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

No comments