निराधार योजनांचे चार महिन्यांचे अनुदान रखडले; मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा किरण धायले अंतुर्ली (संपादक -:- हे...
निराधार योजनांचे चार महिन्यांचे अनुदान रखडले; मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
किरण धायले अंतुर्ली
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे मागील चार महिन्यांपासूनचे अनुदान प्रलंबित असल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे, अन्यथा मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उपतालुकाप्रमुख मोहन शालिकग्राम बेलदार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यातील शेकडो दिव्यांग, विधवा महिला, वृद्ध नागरिक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निराधार कुटुंबांचा उदरनिर्वाह शासनाकडून मिळणाऱ्या या योजनांच्या अनुदानावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून अनुदान न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन प्रलंबित अनुदान आठ दिवसांच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

No comments