"‘तू मर, मग आम्ही लग्न करू...’; पत्नी व प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकां...
"‘तू मर, मग आम्ही लग्न करू...’; पत्नी व प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पारनेर तालुक्यातील ढोकी गावातून नात्याला काळिमा फासणारी आणि संपूर्ण परिसर हादरवून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका ३५ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.याप्रकरणी मृत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पारनेर पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संतोष विठ्ठल नऱ्हे (वय ३५, रा.ढोकी,ता.पारनेर) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.संतोष यांचा विवाह आशाबाई हिच्याशी झाला होता.मात्र, काही काळापासून आशाबाई हिचे गावातीलच सुरेश आप्पा नऱ्हे याच्या सोबत प्रेमसंबंध सूत जुळले होते.या अनैतिक संबंधांतून संतोष यांच्या संसारात मिठाचा खडा पडला.आपल्या प्रेमसंबंधात पती संतोष हा अडथळा ठरत असल्याचे पाहून पत्नी आशाबाई आणि तिचा प्रियकर सुरेश नऱ्हे या दोघांनी संतोष यांना वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली.इतकेच नव्हे तर, “तू मरून जा,त्यानंतर आम्हाला लग्न करता येईल व जमीन आमच्या नावावर करता येईल, मला सोडचिठ्ठी देऊन टाक,” असे म्हणून ते संतोषला वारंवार टोमणे मारत होते आणि क्रूरपणे छळत होते.
सततचा हा अपमान,मानसिक छळ आणि पत्नीचे वागणे यामुळे संतोष पूर्णपणे खचून गेले होते.अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी २० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्यायले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर मृत संतोष यांच्या आई पारूबाई विठ्ठल नऱ्हे (वय ५२) यांनी २५ जून रोजी पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे करत आहेत. या घटनेमुळे ढोकी गावासह संपूर्ण पारनेर तालुक्यात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

No comments