फैजपूरच्या इस्लामपुरा तहानगर भागात अवैधरित्या गोमास विक्री दोनजण ताब्यात फैजपूर पोलिसांची कारवाई इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत ...
फैजपूरच्या इस्लामपुरा तहानगर भागात अवैधरित्या गोमास विक्री दोनजण ताब्यात
फैजपूर पोलिसांची कारवाई
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर, दि. २४ : शहरातील इस्लामपुरा व मिल्लतनगर परिसरात अवैधरित्या गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध फैजपूर पोलिसांनी पहाटे छापेमारी करत कारवाई केली. या कारवाईत सुमारे ८० किलो गोवंश जातीचे मांस व इतर साहित्य असा एकूण २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
फैजपूर पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत इस्लामपुरा भागातील सलीम खान मुसा खान कुरेशी तसेच मिल्लतनगर येथील शेख साजीद शेख रहीम हे अवैधरित्या गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ दोन्ही ठिकाणी छापे टाकले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ८० किलो गोवंश जातीच्या प्राण्यांचे मांस, तराजू-काटे, वजनमापे, मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे लहान-मोठे चाकू, कुऱ्हाडी तसेच लाकडी कुंदे असा एकूण २२,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सलीम खान मुसा खान कुरेशी (वय ४५, रा. इस्लामपुरा, फैजपूर) आणि शेख साजीद शेख रहीम (वय ४६, रा. मिल्लतनगर, फैजपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस कॉन्स्टेबल राहुल काशिनाथ नावकर यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ च्या कलम ५(क) व ९(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ठिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक नीरज गोकील तसेच फैजपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
No comments