चोपडा शहरातील अतिक्रमण हटाव कारवाई विरोधात विरोधी पक्षाची नाराजी; छोट्या व्यावसायिकांना न्याय देण्याची मागणी गटनेता - गजेंद्र जैसवाल चोपडा प...
चोपडा शहरातील अतिक्रमण हटाव कारवाई विरोधात विरोधी पक्षाची नाराजी; छोट्या व्यावसायिकांना न्याय देण्याची मागणी गटनेता - गजेंद्र जैसवाल
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरात नगरपालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईमुळे अनेक छोट्या व्यावसायिकांवर अन्याय झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. अनेक वर्षांपासून हातगाडी, फळभाजी विक्री, चहाचे स्टॉल व इतर लघु व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा योग्य नोटीस न देता हटविण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
विरोधी पक्ष म्हणून आम्ही शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, रस्ते मोकळे व्हावेत आणि अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई व्हावी या भूमिकेचे समर्थन करतो. मात्र प्रशासनाने कारवाई करताना मानवी दृष्टिकोन ठेवणे तितकेच आवश्यक आहे. अनेक हातगाडी धारक व छोटे व्यावसायिक हे रोज कमावून रोज खाणारे असून त्यांच्या व्यवसायावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
सध्याच्या आर्थिक परिस्थितीत व्यापार-व्यवसाय आधीच मंदावलेला असताना या कारवाईमुळे छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या घरातील लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विरोधी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की, शहरातील अतिक्रमण हटविण्यापूर्वी हातगाडी धारक व छोट्या व्यावसायिकांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करावी. त्यांना पुनर्वसनाची संधी दिल्यानंतरच अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात यावी. अन्यथा ही कारवाई गरीब व कष्टकरी वर्गावर अन्याय करणारी ठरेल.
प्रशासनाने तात्काळ संबंधित व्यावसायिकांशी चर्चा करून त्यांच्यासाठी योग्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षाने केली असून छोट्या व्यावसायिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे विरोधी पक्षाचे नगरसेवक व गटनेता गजेंद्र जैसवाल, नरेंद्र पाटील, भूपेंद्र गुजराथी, सौ संध्या महाजन, सौ पूजा देशमुख, शकीलाबी बागवान, डॉ. रोहन पाटील, शरद पाटील तिलकचंद शहा यांच्या वतीने सांगण्यात आले.

No comments