चोपडा कचरा डेपोतील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर विरोधी पक्षाचा आवाज; पाच महिन्यांपासून पगार नाही, सुरक्षा साहित्याचाही अभाव चोपडा प्रतिनिधी : च...
चोपडा कचरा डेपोतील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर विरोधी पक्षाचा आवाज; पाच महिन्यांपासून पगार नाही, सुरक्षा साहित्याचाही अभाव
चोपडा प्रतिनिधी : चंद्रकांत पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपालिकेच्या कचरा डेपोला आज दि.२७ रोजी विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांनी भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांची पाहणी केली. यावेळी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.
कचरा डेपोवर कार्यरत असलेल्या सुमारे ३५ कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सुरक्षा साहित्यच उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. दररोज घातक व अस्वच्छ वातावरणात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे (ग्लोज), डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल, सुरक्षा बूट यांसारख्या मूलभूत सुविधा ना नगरपालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत, ना संबंधित ठेकेदारांकडून. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला.
यावेळी कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची व्यथा नगरसेवकांसमोर मांडली. अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित काम करूनही वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे दिसून आले.
याशिवाय, मूळतः रस्ते झाडण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कचरा विलगीकरणाचे काम करून घेतले जात असल्याचा मुद्दाही नगरसेवकांनी उपस्थित केला. संबंधित कामासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि सुरक्षेची साधने न देता अशा प्रकारे काम करून घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
कचरा डेपोमध्ये लाखो रुपयांची यंत्रसामग्री धूळ खात पडून असल्याचाही आरोप करण्यात आला. कचरा विलगीकरण, प्लास्टिक प्रक्रिया व नष्ट करण्यासाठी उपलब्ध असलेली महागडी उपकरणे आजही बंद अवस्थेत असून, ती कार्यान्वित न झाल्यामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या यंत्रसामग्रीचा उपयोग होत नसल्याने त्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे, प्रलंबित पाच महिन्यांचे वेतन त्वरित अदा करावे, बंद पडलेली यंत्रसामग्री कार्यान्वित करावी आणि कचरा डेपोतील कामकाज अधिक सुरक्षित व कार्यक्षम करावे, अशी मागणी केली.
तसेच, "कचरा व्यवस्थापनासारखी अत्यंत महत्त्वाची सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ कामच नव्हे, तर सुरक्षित वातावरण, वेळेवर वेतन आणि सन्मानाने वागणूक मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अखेर या कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा आणि योग्य सन्मान कधी मिळणार?" असा थेट सवालही अधिकाऱ्यांना यावेळी विचारण्यात आला.
यावेळी गटनेते गजेंद्र जयस्वाल,नगरसेविका सौ. संध्या महाजन,सौ. पूजा देशमुख, नगरसेवक डॉ. रोहन पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते.


No comments