केळी उत्पादक शेतकऱ्यांना लवकर नुकसानभरपाई मिळणार? केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची दिल्लीत उच्चस्तरीय आढावा बैठक किरण धायले मुक्ताईनग...
केळी उत्पादक शेतकऱ्यांना लवकर नुकसानभरपाई मिळणार? केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची दिल्लीत उच्चस्तरीय आढावा बैठक
किरण धायले मुक्ताईनगर / जळगाव प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण जळगाव जिल्gह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि हवामानातील सततच्या बदलामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पीक विमा नुकसानभरपाई तातडीने मिळावी, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयातील संबंधित संचालक चंद्रजित चटर्जी तसेच ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली.
या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या सविस्तरपणे मांडण्यात आल्या. पीक विमा योजनेतील तांत्रिक त्रुटी, अर्जातील चुका, शेतकऱ्यांच्या नावातील विसंगती तसेच प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची नोंद होणे अशा अनेक अडचणींमुळे नुकसानभरपाई मिळण्यात होत असलेल्या विलंबाबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या सर्व त्रुटी तातडीने दुरुस्त करून पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर विम्याचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
यावेळी जिल्ह्यात हवामानाची अचूक नोंद होण्यासाठी स्थानिक पातळीवर वेदर स्टेशन (हवामान केंद्र) ची संख्या वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. अचूक हवामान नोंदी उपलब्ध झाल्यास नुकसानाचे योग्य मूल्यमापन होऊन शेतकऱ्यांना न्याय्य नुकसानभरपाई मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच शेतकऱ्यांना अधिक व्यापक संरक्षण मिळावे यासाठी केवळ एका हंगामापुरता मर्यादित न राहता खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांचा पीक विमा योजनेत समावेश करण्याची मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या पपई पिकालाही केळीप्रमाणे पीक विमा संरक्षण मिळावे, याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीदरम्यान पीक विमा मंजुरी प्रक्रियेला अधिक गती देऊन प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात त्याची हक्काची नुकसानभरपाई कोणताही विलंब न करता जमा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत, जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढणे, त्यांना योग्य न्याय मिळवून देणे आणि शेवटच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचेपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रलंबित पीक विमा नुकसानभरपाई लवकर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments