हातेड खुर्द शिवारात गौण खनिज साठ्याचा मुद्दा चर्चेत; पंचनाम्यानंतरही कारवाईबाबत स्पष्टता नाही शामसुंदर सोनवणे हातेड/चोपडा (संपादक -:- हेमक...
हातेड खुर्द शिवारात गौण खनिज साठ्याचा मुद्दा चर्चेत; पंचनाम्यानंतरही कारवाईबाबत स्पष्टता नाही
शामसुंदर सोनवणे हातेड/चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हातेड : अमळनेर लासुर रोडवरील चक्करबर्डी जवळील हातेड खुर्द शिवारातील एका शेतात तिन वर्षे भाडे तत्वावर चालवल्या एका खासगी कंपनीच्या जागेत मोठ्या प्रमाणावर गौण खनिज साठा आढळून आल्याची बाब समोर आली असून, पंचनामा झाल्यानंतरही कारवाईबाबत अधिकृत माहिती उपलब्ध न झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी वाळू, खडी, डस्ट, अर्धा तसेच पवना कच यांसारख्या गौण खनिजांचा साठा असल्याची नोंद महसूल विभागाच्या पंचनाम्यात करण्यात आली आहे. दिनांक १ जून २०२६ रोजी तलाठी, महसूल विभाग यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, वृत्तांकनासाठी पंचनाम्याची प्रत मागविण्यात आली असता ती तहसील कार्यालयातून उपलब्ध होईल, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत कारवाईचा तपशील, आकारण्यात आलेला दंड अथवा जप्तीची प्रक्रिया याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पंचनामा झाल्यानंतर काही दिवस उलटूनही कारवाईबाबत स्पष्ट माहिती समोर न आल्याने नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. संबंधित साठ्याबाबत नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली, दोषींवर दंडात्मक कारवाई झाली का, तसेच महसूल विभागाची पुढील भूमिका काय राहणार याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी महसूल प्रशासनाने या प्रकरणी अधिकृत भूमिका जाहीर करून पंचनामा अहवाल, कारवाईचा तपशील व संबंधित माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.


No comments