adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"अण काय ते खड्डे, अन काय तो रस्ता!" : सोनवद-बाभुळगाव रस्ता जीवघेणा, ग्रामस्थ त्रस्त, अधिकारी सुस्त

 "अण काय ते खड्डे, अन काय तो रस्ता!" : सोनवद-बाभुळगाव रस्ता जीवघेणा, ग्रामस्थ त्रस्त, अधिकारी सुस्त  विकास पाटील धरणगाव  (संपादक -...

 "अण काय ते खड्डे, अन काय तो रस्ता!" : सोनवद-बाभुळगाव रस्ता जीवघेणा, ग्रामस्थ त्रस्त, अधिकारी सुस्त 


विकास पाटील धरणगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव: "अण काय ते खड्डे, अन काय तो बाभुळगाव-सोनवद रस्ता, अण काय ते लोकप्रतिनिधी एकदम ओके हाय" अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत नागरिकांनी सोनवद-बाभुळगाव रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल संताप व्यक्त केला आहे. खड्ड्यांमुळे हा रस्ता आता जीवघेणा ठरत असून "संबंधित विभाग अजून कुणाचा जीव जाण्याची वाट पाहतोय का?" असा संतप्त सवाल परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत.

शासनाला महसूल देणाऱ्या रस्त्याचीच दयनीय अवस्था

बाभुळगाव परिसरात वीटभट्ट्यांसाठी शासनाने गौण खनिजाचे परवाने दिलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून दिवस-रात्र अवजड ट्रॅक्टर-ट्रॉलींची मोठी वर्दळ सुरू असते. म्हणजेच शासनाला दरवर्षी लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या याच रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालवणे देखील कठीण झाले आहे.

पावसाळ्यात धोका आणखी वाढणार

पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडणे, वाहनांचे नुकसान होणे असे अपघात नित्याचेच झाले आहेत. येत्या पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती आणखी भीषण होणार असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक वेळा एसटी बस गावात येत नाही. त्यामुळे सोनवद, धरणगाव येथे शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना पायी किंवा खासगी वाहनाने धोका पत्करून जावे लागते.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे हाल

गावात रुग्णालयाची सोय नसल्याने रात्री-अपरात्री एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णांना धरणगाव किंवा जळगाव येथे न्यावे लागते. मात्र रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे रुग्णवाहिका देखील वेळेत पोहोचू शकत नाही. खडतर प्रवासामुळे रुग्णांची प्रकृती आणखी गंभीर होत असल्याच्या घटना घडल्या आहेत.

नागरिकांची मागणी: प्रशासनाला जाग कधी येणार?

"या रस्त्यावर दर आठवड्याला छोटे-मोठे अपघात घडत आहेत. तक्रारी देऊनही लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. सध्या 'ग्रामस्थ त्रस्त आणि अधिकारी सुस्त' अशी अवस्था आहे," अशी खंत बाभुळगाव येथील नागरिकांनी व्यक्त केली.

या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन सोनवद-बाभुळगाव हा संपूर्ण रस्ता नव्याने डांबरीकरण करून दुरुस्त करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार विकास पाटील यांनी दिला आहे. बाबुळगाव ते सोनवद हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करून अपघातांची मालिका थांबवावी अशी एकमुखी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

No comments