शेतकऱ्यांच्या समस्यांची पालकमंत्र्यांकडून तत्काळ दखल; अवघ्या २४ तासांत वीज वितरण कंपनीच्या तक्रारीचे निवारण अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक ...
शेतकऱ्यांच्या समस्यांची पालकमंत्र्यांकडून तत्काळ दखल; अवघ्या २४ तासांत वीज वितरण कंपनीच्या तक्रारीचे निवारण
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोताळा:- लिहा (बु.) येथील शेतकऱ्यांच्या वीज वितरण कंपनीच्या संदर्भातील तक्रारीची दखल घेत, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद (मकरंद आबा) पाटील यांनी तत्काळ कार्यवाही केली आहे. पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांची समस्या अवघ्या एका दिवसात मार्गी लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
लिहा (बु.) येथील शेतकरी रामदास सपकाळ आणि त्यांच्या इतर सहकारी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे होणाऱ्या त्रासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी गजानन बोडखे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा व गणेश शिंदे पाटील ( तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोताळा) यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामेश्वर पाटील यांनी तातडीने पावले उचलली.
रामेश्वर पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांची बुलढाणा येथील त्यांच्या दालनात भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्यांचे गांभीर्य पटवून देताच, पालकमंत्र्यांनी त्याच वेळी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना भ्रमणध्वनीवरून (फोनवरून) संपर्क साधून तातडीने समस्या सोडविण्याचे कडक आदेश दिले.
शेतकऱ्यांकडून समाधान
पालकमंत्र्यांनी घेतलेल्या तत्काळ निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आदेश मिळताच वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेने सक्रिय होत केवळ एका दिवसात शेतकऱ्यांची समस्या निकाली काढली. या तत्परतेमुळे लिहा (बु.) परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री ना. मकरंद पाटील, जिल्हा सरचिटणीस रामेश्वर पाटील आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

No comments