गौरक्षण संस्थानसमोर रस्ता दुभाजकात कट ठेवण्याची मागणी; अन्यथा चक्काजाम आंदोलनाचा इशारा अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
गौरक्षण संस्थानसमोर रस्ता दुभाजकात कट ठेवण्याची मागणी; अन्यथा चक्काजाम आंदोलनाचा इशारा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : शहरातील बुलढाणा रोडवर सुरू असलेल्या रस्ता दुभाजकाच्या कामामध्ये गौरक्षण संस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कट ठेवण्यात यावा, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सोमवार (८ जून) रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा रोडवरील रस्ता दुभाजकाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या मार्गालगत असलेल्या गौरक्षण संस्थानमध्ये सुमारे ३०० हून अधिक गायी व इतर जनावरे आहेत. या जनावरांना दररोज चारण्यासाठी शहराबाहेर नेले जाते. त्यामुळे त्यांची ने-आण करताना रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी संस्थानसमोर दुभाजकात कट असणे अत्यावश्यक आहे.
प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जर कट ठेवण्यात आला नाही तर जनावरांना दूरवरून वळसा घालून न्यावे लागेल. त्यामुळे वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच वाहतुकीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच गौरक्षण संस्थानमध्ये जनावरांसाठी कुट्टी व इतर खाद्यपदार्थ घेऊन येणाऱ्या वाहनांची नियमित ये-जा सुरू असते. या वाहनांनाही कटमुळे सहजपणे प्रवेश व निर्गमन करता येईल.
गौरक्षण संस्थानातील गायी व जनावरांच्या सोयीचा तसेच वाहतूक सुरळीत राहण्याचा विचार करून संस्थानसमोर रस्ता दुभाजकात कट ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने तातडीने घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीबाबत प्रशासनाने त्वरित व सकारात्मक निर्णय न घेतल्यास गौरक्षण संस्थानसमोर रस्ता दुभाजकावरच चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.
निवेदन सादर करताना जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्यासह आशिष माहुरकर, दीपक कपले, दीपक चवरे, बलराम बावस्कार, राहुल संचेती, राजकुमार बाहेती, पंकज टावरी, मिलिंद काबरा, मयूर चौधरी, राजू भटेजा, शेख मोहम्मद, करण नायसे, शुभम निवाणे, सतीष दाने, रविंद्र बाम्हंदे, अशोक गाढवे, श्रीकृष्ण सातव, निलेश चोपडे, अॅड. प्रभाकर म्हैसागर, राजू पुनेकर, श्रीकृष्ण तायडे, किशोर सोनोने, शालीकराम पाटील, अमोल टप, बबलू बैरागी यांच्यासह गौमाता सेवक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments