भाजप पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील बदनामीप्रकरणी पोलीसांकडे कारवाईची मागणी चोपडा तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचे निवेदन; आमदार गिरीश महाजन य...
भाजप पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील बदनामीप्रकरणी पोलीसांकडे कारवाईची मागणी
चोपडा तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचे निवेदन; आमदार गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा आरोप
चोपडा प्रतिनिधी : चंद्रकांत पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
भारतीय जनता पक्ष, चोपडा तालुक्याच्या वतीने सोशल मीडियावरून राज्याचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह फोटो व टिप्पणी प्रसारित करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी चोपडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर (एक्स) आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह स्वरूपाचे फोटो व मजकूर प्रसारित करण्यात आले आहेत. या कृत्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होण्याबरोबरच सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निवेदनानुसार, संबंधित व्यक्तींकडून जाणीवपूर्वक बदनामीकारक मजकूर प्रसारित करून राजकीय नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, त्यामुळे सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे समाजात द्वेषाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे संबंधित व्यक्तींची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, फोटो व संदेश तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या अफवा, खोट्या माहितीचा प्रसार व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून,पोलीस प्रशासनाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.



No comments