मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी; २५.८० लाखांच्या २९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत चार संशयित ताब्यात; गुजरातसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्...
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी; २५.८० लाखांच्या २९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत
चार संशयित ताब्यात; गुजरातसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील वाहनचोरीचे गुन्हे उघड
मुक्ताईनगर प्रतिनिधी : किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत मुक्ताईनगर पोलिसांनी मोठे यश मिळवत तब्बल २५ लाख ८० हजार रुपये किमतीच्या २९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी दोन प्रौढ व दोन अल्पवयीन अशा चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत गुजरातसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाहन चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात २६ जून २०२६ रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक २७३/२०२६ (भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२)) चा तपास सुरू करण्यात आला.
तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल सुरेश सोनवणे (रा. पिंपरुड, ता. यावल), कुंदन सुनिल महाले (रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) तसेच दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी सदर गुन्ह्यासह आणखी २९ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपी चोरी केलेल्या मोटारसायकली थेट स्वतःकडे न ठेवता विविध रेल्वे स्थानके व बसस्थानकांवरील 'पे अँड पार्क' पार्किंगमध्ये उभ्या करून तेथूनच ग्राहकांना विक्री करत असल्याचे तपासात समोर आले. या पद्धतीमुळे चोरीच्या वाहनांचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.
आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोटारसायकलींची पडताळणी केली असता त्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या परिवहन विभागात नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या सर्व मोटारसायकलींची एकूण अंदाजे किंमत २५ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे गुजरातमधील उधना (सुरत) तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण, नवी मुंबईतील नेरुळ, नाशिक जिल्ह्यातील निफाड, वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, रायगड जिल्ह्यातील नेरळ तसेच जळगाव जिल्ह्यातील पारोळा, जिल्हापेठ आणि एरंडोल पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात पोहेकॉ अजय खंडेराव, महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक असिम तडवी, कल्पेश आमोदकर तसेच पोलीस अंमलदार संदीप धनगर, सुनिल मोरे, चेतन महाजन, रविंद्र धनगर, प्रशांत चौधरी, रमेश खोडपे, दीपक ढाकरे, स्वप्निल पवार आणि अक्षय वाढे यांनी संयुक्तपणे पार पाडली.
या कारवाईमुळे केवळ मुक्ताईनगरच नव्हे, तर राज्यातील विविध जिल्ह्यांतील वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासालाही महत्त्वाची दिशा मिळाली असून, संघटित वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुक्ताईनगर पोलिसांना उल्लेखनीय यश मिळाले आहे.

No comments