कोकळगाव येथे ५९ ब्रास अवैध वाळू जप्त अप्पर तहसीदार शिवाजी कदम यांची धडक कारवाई; अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ. लातूर, जि. प्र.(उत्त...
कोकळगाव येथे ५९ ब्रास अवैध वाळू जप्त अप्पर तहसीदार शिवाजी कदम यांची धडक कारवाई; अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ.
लातूर, जि. प्र.(उत्तम माने)
(संपादक हेमकांत गायकवाड)
निलंगा तालुक्यातील कोकळगाव परिसरात मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैधरीत्या वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला असून विविध ठिकाणी साठवून ठेवण्यात आलेली अंदाजे ५९ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकळगाव परिसरात अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अप्पर तहसीदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला तसेच विविध ठिकाणी साठवून ठेवलेली वाळू जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या वाळूमध्ये मसणवाटा येथील ४ ब्रास, बसवेश्वर वाचनालय परिसरातील १० ब्रास, पाण्याच्या टाकीजवळील ७ ब्रास, विविध शेत व मोकळ्या जागांवरील साठ्यासह एकूण ५९ ब्रास वाळूचा समावेश असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.
या कारवाईदरम्यान मंडळ अधिकारी सरस्वती चित्ते व तलाठी बालाजी नरवटे उपस्थित होते. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा व साठा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभागाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले असून अवैध वाळू उपशावर कायमस्वरूपी आळा घालण्याची मागणी केली आहे. ग्रामीण वार्ता पत्राने मांडलेल्या प्रश्नांची प्रशासनाने तत्काळ दखल घेतल्याने वृत्तपत्राच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

No comments