adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आठ दिवसांच्या वेदनांतून नंदीची सुटका; गौसेवकांचा दोन तासांचा जीवघेणा रेस्क्यू यशस्वी

आठ दिवसांच्या वेदनांतून नंदीची सुटका; गौसेवकांचा दोन तासांचा जीवघेणा रेस्क्यू यशस्वी  पल्लवी पाटील खामगाव  : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शह...

आठ दिवसांच्या वेदनांतून नंदीची सुटका; गौसेवकांचा दोन तासांचा जीवघेणा रेस्क्यू यशस्वी 


पल्लवी पाटील खामगाव  :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शहरातील नांदुरा रोडवरील देवेंद्र हॉटेलच्या मागील गल्लीत असलेल्या बंद पडलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या जीर्ण व क्षतिग्रस्त प्लॉटमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे एका मुक्या नंदीला तब्बल आठ दिवस अमानुष वेदना सहन कराव्या लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. अखेर एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या गौसेवकांनी दोन तासांच्या जीवघेण्या रेस्क्यू मोहिमेद्वारे नंदीची यशस्वी सुटका करून त्याला नवजीवन दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्लॉटमध्ये पडलेल्या धारदार लोखंडी डब्याचा तुकडा नंदीच्या समोरील उजव्या खुरात खोलवर रुतला होता. त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर जखम झाली होती. असह्य वेदनांमुळे नंदी आक्रमक बनला होता आणि गेल्या आठ दिवसांपासून परिसरात सैरावैरा धावत नागरिकांच्या अंगावर धावून जात होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक नागरिक तसेच परिसरातील रहिवाशांनी नंदीला पकडून त्याची सुटका करण्याचे अनेक प्रयत्न केले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही काठ्या व इतर साधनांच्या सहाय्याने प्रयत्न केले, मात्र वेदनांमुळे आक्रमक झालेल्या नंदीवर नियंत्रण मिळवण्यात कुणालाही यश आले नाही.

आज सकाळी या घटनेची माहिती एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे गौसेवक सुरजभैय्या यादव यांना मिळताच त्यांनी गौरव कवटेकर, रोहित तायडे आणि चेतन तंबोले यांना सोबत घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभा असलेला, रक्तबंबाळ पायामुळे विव्हळ झालेला नंदी पाहून सर्वांनाच धक्का बसला.

मात्र कोणतीही भीती न बाळगता सुरजभैय्या यादव यांनी जीवाची पर्वा न करता सलग दोन तास प्रसंगावधान, धाडस आणि कौशल्य दाखवत दोरीच्या सहाय्याने नंदीला नियंत्रणात आणले. त्यानंतर अत्यंत धोकादायक परिस्थितीत त्याच्या खुरात रुतून बसलेला लोखंडी डब्याचा तुकडा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला.

यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीराम ठोंबरे यांनी घटनास्थळी येऊन नंदीवर आवश्यक औषधोपचार व इंजेक्शनद्वारे उपचार केले. आठ दिवसांच्या असह्य वेदनांनंतर मुक्त झालेला नंदी शांतपणे तेथून निघून गेला.

यावेळी सुरजभैय्या यादव म्हणाले की, "सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः बंद पडलेल्या प्लॉटमध्ये कचरा व लोखंडी वस्तू टाकण्यामुळे मुक्या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. नागरिकांनी याबाबत जागरूक राहावे. मुक्या जनावरांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे."

या धाडसी रेस्क्यू मोहिमेचे नागरिकांकडून कौतुक होत असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या वाढत्या समस्येकडेही या घटनेमुळे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.  अशी माहिती योगेश राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे 

No comments