PMOPG तक्रारीवर कार्यवाही न झाल्याचा आरोप; गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशी व निलंबनाची मागणी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
PMOPG तक्रारीवर कार्यवाही न झाल्याचा आरोप; गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशी व निलंबनाची मागणी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : मलकापूर ग्रामीण येथील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पंतप्रधान जन तक्रार निवारण पोर्टल (PMOPG) वर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर कोणतीही योग्य कार्यवाही न करता ती निकाली काढण्यात आल्याचा आरोप करत निलेश बाळू चोपडे यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. चोपडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मलकापूर ग्रामीण परिसरातील रस्त्याच्या समस्येबाबत प्रथम ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने PMOPG पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेऊन प्रकरण संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. तथापि, गटविकास अधिकारी कार्यालयाकडून कोणताही संपर्क साधण्यात आला नाही, प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली नाही तसेच कोणतेही लेखी उत्तर किंवा कार्यवाही अहवाल देण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. असे असतानाही तक्रार निकाली काढण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदाराची बाजू न ऐकता एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
No comments