विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ मलकापूर बंद; वंचित बहुजन आघाडीची निषेध रॅली अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) म...
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ मलकापूर बंद; वंचित बहुजन आघाडीची निषेध रॅली
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्ज, अश्रुधूराचा वापर व अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत मलकापूर शहरात बंद पाळण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची तसेच संबंधित दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
शहीद संजयसिंह राजपूत स्मारकापासून रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत तालुकाध्यक्ष विजय झनके यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
यानंतर महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे मलकापूर तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत कळासे, तुळशीराम वाघ, अजय वानखेडे, गणेश सावळे, धम्मपाल उमाळे, यासीन कुरेशी, अरविंद सोनोने यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व शेकडो नागरिक उपस्थित होते.



No comments