अत्यंत जड अंतःकरणाने लोकनेते स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन; २२ ते २८ जुलैदरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा होणार ‘जनसेवा सप्ताह’...
अत्यंत जड अंतःकरणाने लोकनेते स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन; २२ ते २८ जुलैदरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा होणार ‘जनसेवा सप्ताह’
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दि. २२ ते २८ जुलैदरम्यान राज्यभर ‘जनसेवा सप्ताह’ विविध लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. हा सप्ताह अत्यंत जड अंतःकरणाने, मात्र स्व. अजितदादा यांना अभिप्रेत असलेल्या लोककल्याणकारी कार्यक्रमांद्वारे साजरा केला जाईल, अशी माहिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रभारी तथा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार अनिलदादा पाटील यांनी दिली.
रविवारी (दि. १९) यावल येथील बोरावल रस्त्यावरील स्टार लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जनसेवा सप्ताह नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. आमदार अनिलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीच्या प्रारंभी लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी प्रास्ताविक केले.
मार्गदर्शन करताना आमदार अनिलदादा पाटील यांनी जनसेवा सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व लोककल्याणकारी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत प्रत्येक बूथवर बीएलओ नियुक्त करून गावापासून जिल्हास्तरापर्यंत मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महिलांसाठी सुरक्षा जागरूकता मेळावे, स्वयंसहाय्यता गट जोडणी, ‘महिला वचन अभियान’ अंतर्गत पोलीस स्टेशन भेटी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी ‘झाडे दादांची – सावली गावाची’ या संकल्पनेतून वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात येणार असून प्रत्येक गावात शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायत हद्दीत किमान १०० वृक्षांची लागवड तसेच ‘एक कार्यकर्ता – एक झाड’ हा संकल्प राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
याशिवाय प्रत्येक तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधक जनजागृती व फवारणी, आयुष्मान भारत व महाराष्ट्र आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मदत अशा विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या समस्या गावागावांत नोंदवून त्याचा पाठपुरावा करणे, पीकविमा, कर्जमाफी, मनरेगा, श्रमिक कार्ड नोंदणी शिबिरे तसेच बांधकाम व औद्योगिक कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
युवक व विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन प्रवेश मार्गदर्शन, समुपदेशन शिबिरे, मदत कक्ष, शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेवर आधारित व्याख्याने, परिसंवाद, निबंध स्पर्धा तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या व्यक्तिमत्त्व व राज्याच्या विकासातील योगदानावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीला प्रदेश सरचिटणीस रवींद्र (नाना) पाटील, प्रदेश प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे, माजी आमदार कैलासबापू पाटील, माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील, उद्योजक घनश्याम अग्रवाल, राजेश वानखेडे, आनंदराव देशमुख, ज्ञानेश्वर महाजन, विवेक ठाकरे, गुणवंतभाऊ नीळ, अरविंद चितोडिया, शेख कुरबान, डॉ. सोपान दुट्टे, भगतसिंग पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वरभाऊ (नाना) पाटील, बाळासो. विजय पाटील, विलास पाटील, गोपाळ पाटील, मुन्ना सोनवणे, जितेंद्र सोनवणे, कदीर खान, सुनील पाटील, सचिन पाटील, प्रकाश पाटील, आसिफ बागवान, विजय सोनार, रज्जाक इकबाल शेख यांच्यासह रावेर लोकसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रावेर, भुसावळ, चोपडा, फैजपूर, यावल व सावदा येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीत प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, माजी चेअरमन घनश्याम पाटील, भगतसिंग पाटील तसेच सावद्याच्या युवा नगरसेविका कु. सिमरन वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे यांनी केले, तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा चोपडे, अँड. देवकांत पाटील, आकाश चोपडे, विनोद पाटील आणि योगिता घोडके यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments