केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर वाशिममध्ये कॉक्रोज जनता पार्टीकडून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा वाशीम प्रतिनिध...
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर वाशिममध्ये कॉक्रोज जनता पार्टीकडून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा
वाशीम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वाशिम : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कॉक्रोज जनता पार्टी महाराष्ट्रच्या वतीने पेढे वाटून, फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की ,गेल्या दोन महिन्यांपासून नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे जबाबदारी स्वीकारून भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी दोषीवर कारवाई करावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात तसेच प्रभावित विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन सुरू होते.
या आंदोलनाला पर्यावरणवादी व वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषणाद्वारे समर्थन दिले होते. तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटना, विद्यार्थी व नागरिकांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला होता. सरकारवर वाढत्या जनदबावामुळे हा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला होता.
या आंदोलनाला पाठिंबा म्हणून 20 जुलै 2026 रोजी जंतर-मंतर समिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला समर्थन द्यावे म्हणून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जगदीश मानवतकर यांच्या नेतृत्वाखाली कॉक्रोज जनता पार्टी महाराष्ट्र व विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय साखळी उपोषण आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
काल दिनांक 25.07. 2026 रोजी भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त करत वाशिममध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कार्यकर्त्यांनी "भारत माता की जय", "वंदे मातरम्", "जय भीम" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी पेढे वाटण्यात आले तसेच फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास जगदीश मानवतकर (कॉक्रोज जनता पार्टी महाराष्ट्र) , डॉ.सिद्धार्थ देवळे साहेब (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), महादेव आवारे,रामदास कालापाड, गणेश वानखडे, सुभाष वाठोरे, अँड.सेवेंद्र सोनोने, संविधान ढोले, रवी ठोके, आशिष कोकरे, संतोष लांडकर, अक्षय इंगोले तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments