ध्वनीप्रदूषणावर चोपडा पोलिसांचा 'वॉच'; डीजे चालकांना नियम पाळण्याच्या सक्त सूचना रात्री १० नंतर डीजेला 'नो एन्ट्री'; नियमभंग...
ध्वनीप्रदूषणावर चोपडा पोलिसांचा 'वॉच'; डीजे चालकांना नियम पाळण्याच्या सक्त सूचना
रात्री १० नंतर डीजेला 'नो एन्ट्री'; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने चोपडा शहर पोलीस ठाण्यात डीजे चालक, मालक व ऑपरेटर यांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सर्व डीजे चालकांना ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देत नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला.
बैठकीत रात्री १०.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत डीजे व लाऊडस्पीकर वाजविण्यास पूर्णतः बंदी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच शांतता क्षेत्र, निवासी क्षेत्र आणि व्यापारी क्षेत्रासाठी शासनाने निश्चित केलेल्या ध्वनीमर्यादांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सांगितले की, अत्याधिक ध्वनीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. बहिरेपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा धोका, मानसिक ताण, निद्रानाश तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालक, मालक व ऑपरेटर यांच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा, ध्वनीप्रदूषण नियम तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार फौजदारी गुन्हा दाखल करणे, डीजे साहित्य जप्त करणे, आर्थिक दंड आकारणे तसेच वाहन व व्यवसाय परवाना रद्द करण्यासाठी संबंधित विभागाकडे शिफारस करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात साजरे व्हावेत यासाठी सर्व डीजे चालकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी बैठकीत केले.



No comments