दिल्लीतील 'सहकार से समृद्धी' कार्यक्रमात शामलताई झांबरे यांचा सन्मान; जळगाव जिल्ह्याचा गौरव अरुण धनगर वरणगाव (संपादक -:- हेमकांत ...
दिल्लीतील 'सहकार से समृद्धी' कार्यक्रमात शामलताई झांबरे यांचा सन्मान; जळगाव जिल्ह्याचा गौरव
अरुण धनगर वरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 'सहकार से समृद्धी' या पाच वर्षांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा मुख्य सोहळा उत्साहात पार पडला. देशातील सहकार क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालिका सौ. शामलताई अतुल झांबरे यांना विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचा बहुमान मिळाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, राजस्थानचे मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासह देशभरातील सहकार क्षेत्रातील मान्यवर, विविध राज्यांतील प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेला सहकाराच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्यासाठी विविध विषयांवर या परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली.
देशभरातून निवडक सहकार प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सौ. शामलताई झांबरे यांना मिळाली. त्यांच्या उपस्थितीमुळे जळगाव जिल्ह्याच्या सहकार चळवळीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे मानले जात आहे.
दूध संघाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी तसेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सौ. झांबरे यांनी केलेल्या कार्याची ही योग्य दखल असल्याची भावना सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या सहभागामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.दरम्यान, दिल्ली येथे झालेल्या या राष्ट्रीय कार्यक्रमात मिळालेल्या बहुमानाबद्दल भारतीय जनता पार्टी, वरणगाव शहर व तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी सौ. शामलताई झांबरे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

No comments